मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत मिसळले विष...
तिघांवर गुन्हा दाखल

सौंदत्ती – प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाची बदली व्हावी म्हणून शाळेतील पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याचा प्रकार कर्नाटकातील सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडलाय. यामध्ये अकरा मुलांना विषबाधा झालीय. या प्रकरणी सागर सक्रेप्पा पाटील, नागनगौडा बसाप्पा पाटील, कृष्णा यमनाप्पा मादर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलीय.
याबाबतची माहिती अशी कि, सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावातील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेत पंधरा दिवसांपूर्वी अकरा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बेळगाव पोलिसांनी या विषबाधेच्या घटनेचा सखोल तपास केला. यामध्ये हुलीकट्टी प्राथमिक शाळेतील १३ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या सुलेमान घोरी नायक यांना मुख्याध्यापक पदावरून काढण्यासाठीच हा कट रचण्यात आल्याचं दिसून आलं. विषबाधेमुळे शाळेतील विद्यार्थी मृत पावले तर त्याचा ठपका मुख्याध्यापकावर येवून त्यांची बदली करता येईल, असा कटाच्या पाठीमागचा उद्देश होता. नागनगौडा पाटील आणि कृष्णा मादर या दोघांनी एका खतविक्रीच्या दुकानातून कीटकनाशक आणलं. शाळेतील एका मुलाला चॉकलेट आणि आर्थिक आमिष दाखवून कीटकनाशकाची बाटली पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितली होती. टाकीतील पाणी प्यायल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखणं, उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. घटनेच्या सखोल तपासानंतर हा प्रकार उघडकीस आला.