मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कमधून शिलाई मशीनची चोरी करणाऱ्या तिघांना अटक

कोल्हापूर - कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक टेक्सटाईल पार्कमधील शेडचे शटर उचकटून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला शिलाई मशीनची चोरी केली होती. या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी आनंदा माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करत पुणे - बेंगलोर महामार्गावर सापळा लावून चोरीची नवीन शिलाई मशीन विक्रीसाठी मुंबईला घेऊन जात असलेल्या तिघांना पकडले. शफातूल्ला खान, विजयकुमार नारायण सिंग आणि अफजल खान अशी त्या तिघांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची शिलाई मशीन, स्टॅन्ड आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा सुमारे साडेअठरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.