भैरीबांबरमध्ये भीषण आग...
१५ एकर काजू-आंबा बाग जळून खाक...
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील भैरीबांबर परिसरालगत असलेल्या गट क्रमांक ५९५ मधील मारुती बापु सातपुते यांच्या शेतात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. कोरडे हवामान आणि वेगवान वाऱ्यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सुमारे १५ एकर क्षेत्रातील काजू बाग, कलमी आंबे, नारळ, पेरू, आवळा, जांभूळ यांसारखी हजारो फळझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याशिवाय बांबू शेती, औषधी वनस्पती, सोलर पंप, ड्रिप सिंचन यंत्रणा आणि पाइपलाईनही पूर्णपणे जळून खाक झाली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठी हानी झाली होती. यंदा काजू पिकाला भरघोस बहर आला होता आणि तोडणी हंगामाच्या उंबरठ्यावर असतानाच ही दुर्घटना घडली. त्यामुळे सातपुते यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आगीचे कारण स्पष्ट झाले नसून ती नैसर्गिक होती की जाणूनबुजून लावण्यात आली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून होत आहे. या घटनेमुळे भैरीबांबर परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.