करवीरच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडं मनसे पदाधिकाऱ्यानं मागितली दहा लाखाची खंडणी
कोल्हापूर - डॉक्टर उत्तम मदने हे करवीर पंचायत समितीत वैद्यकीय अधिकारी म्हणून २०२३ पासून सेवेत आहेत. करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या एका मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग अॅक्ट नुसार मागणीप्रमाणं परवाना दिलाय. दरम्यान, डॉक्टर मदने यांना ३१ मार्च रोजी मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं फोन करून या रुग्णालयाला परवानगी का दिली? अशी विचारणा केली. सहा एप्रिल रोजी कार्यालयात बोलावून घेऊन या हॉस्पिटलच्या परवाना मागणी अर्जात त्रुटी आहेत. मग परवाना का दिला? संबंधित रुग्णालयाकडून दहा लाख रुपये खंडणी घेऊन मला द्या. अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यानं आपल्याकडं केल्याचं डॉ. मदने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
डॉ. मदने यांनी या प्रकरणी करवीर पोलिसात संबंधित मनसे पदाधिकाऱ्याविरोधात कॉल रेकॉर्डिंगसह लेखी तक्रार दिलीय. दरम्यान, या दमदाटीचं कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमात प्रसारित झाल्यानं एकच खळबळ उडालीय.