शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात बुडालेल्या पुजाऱ्याचा मृतदेह सापडला
कोल्हापूर - दुर्गमानवाडातील विठलाई देवी मंदिराचे पुजारी अरुण गुरव हे चैत्र यात्रेनिमित्त बुधवारी जोतिबा डोंगरावर आले होते. दर्शन घेऊन रात्री त्यांनी बहिणीकडे मुक्काम केला. गुरुवारी सकाळी ते मित्रासह चारचाकीने गावाकडे परतत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास अंघोळ करण्यासाठी ते शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदी पात्रात उतरले मात्र पोहोताना त्यांची दमछाक झाली. ते गटांगळ्या खात असल्याने नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र नागरिकांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ते नदीपात्रात मध्यभागी बुडाले. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस, तलाठी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी दिवसभर शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र सायंकाळी अचानक आलेला पाऊस आणि वाढत्या अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली होती. त्यानंतर आज सकाळपासून आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाकडून नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. गुरव यांच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.