कोल्हापुरात बिबट्याच्या कातड्यांची तस्करी उघड; कोल्हापुरात चौघे जेरबंद

<p>कोल्हापुरात बिबट्याच्या कातड्यांची तस्करी उघड; कोल्हापुरात चौघे जेरबंद</p>

कोल्हापूर : शहरानजीकच्या पुणे-बंगळुरू महामार्गावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन बिबट्याची कातडी व एक आलिशान कार जप्त करण्यात आली.

सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रतिबंधक व गुप्तचर’ शाखेला मिळालेल्या माहितीनुसार अधीक्षक हिमांशू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने २९ मार्च रोजी पहाटे शिरोली एमआयडीसी परिसरात सापळा रचला. यावेळी दोन संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्यात आले होते. ‘किया सेल्टोस’ गाडीतून तीन जणांना बिबट्याच्या कातड्यासह ताब्यात घेण्यात आले. तर पांढऱ्या रंगाची ‘फोर्ड फिगो’ गाडी पोलिसांना चकवा देत पसार झाली. मात्र त्या गाडीतील एक व्यक्ती कातडी असलेली पिशवी घटनास्थळी टाकून पळून गेला.

या प्रकरणी समीर तेजम, राकेश बांदेकर (रा. कुडाळ), शेख नसरुद्दीन हबीब (रा. लातूर) आणि विजय जमदाडे (रा. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून बिबट्याची दोन कातडी, वाहन तसेच काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या चौघांना वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी वनविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. संशयित चाैघांना कोल्हापूर येथील बिंदू चौक कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

कारवाईत अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर, संदीप कौशिक यांच्यासह निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा आणि हवालदार संजय जाधव व अभिषेक यादव यांचा सहभाग होता.