महाराणी ताराबाईंबाबतच्या वक्तव्यावरून वाद; इतिहास बदलण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन

<p>महाराणी ताराबाईंबाबतच्या वक्तव्यावरून वाद; इतिहास बदलण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन</p>

कोल्हापूर : करवीर राज्याच्या संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराबाई या जैन समाजातील असल्याचे विधान केल्याने ऐतिहासिक आणि सामाजिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी या विधानाचा निषेध करताना सांगितले की, महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या महाराणी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांनी अत्यंत धैर्याने आणि पराक्रमाने स्वराज्य सांभाळले व मुघलांविरुद्ध लढा देत त्यांना पराभूत केले. तसेच त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असून त्या क्षत्रिय मराठा कुळातील असल्याचे इतिहासातून स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

मालोजीराजे छत्रपती यांनी पुढे म्हटले की, “वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जैन समाजाविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे; मात्र इतिहास बदलण्याचा किंवा चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न होऊ नये.”