कोल्हापूरात अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त

<p>कोल्हापूरात अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त</p>

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध दारूविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गोवा बनावटीची दारू व एक टाटा ट्रक यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

३१ मार्च २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील बसस्टॉप परिसरात सापळा रचण्यात आला. नेर्ले-बांबवडे मार्गावरून कोल्हापूरकडे येणारा संशयित टाटा ट्रक (एमएच-२७-बीएक्स-४७५६) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये एकूण २४६८ बॉक्स दारू सापडली. यात सनकिक व्हिस्की (१८० मि.ली.), गोवा व्हिस्की (७५० मि.ली.) व गोवा व्हिस्की (१८० मि.ली.) अशा विविध प्रकारांचा समावेश असून दारूची एकूण किंमत १ कोटी ६४ लाख ६ हजार २२० रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या ट्रकसह एकूण मुद्देमालाची किंमत १ कोटी ७९ लाख ६ हजार २२० रुपये आहे. या प्रकरणी ट्रक चालक संतोष बंडू पेटकर (वय ४६, रा. इस्लामपूर, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीत ट्रक मालक असीम अब्दुल्ला शेख (वय ६०, रा. देवास, मध्यप्रदेश) याचाही सहभाग उघड झाला आहे. दोघांविरुद्ध शाहुवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस कर्मचारी यांचे विशेष योगदान आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.