सांगरुळमध्ये सराफाला लुटणाऱ्या दोघा संशयितांना एलसीबीकडून अटक

<p>सांगरुळमध्ये सराफाला लुटणाऱ्या दोघा संशयितांना एलसीबीकडून अटक</p>

कोल्हापूर - शहरातील पंचगंगा हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या तेजाराम माळी यांचे करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. २१ मार्चला तेजाराम माळी हे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सांगरूळमधील दुकान बंद करून कोल्हापूरला परत येत असताना सांगरुळमधील स्मशानभूमी नजीक दोन मोपेडवरून आलेल्या चौघानी त्यांना अडवून त्यांच्याकडील दागिने लुटले होते. या प्रकरणी माळी यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना शुक्रवार पेठ परिसरात राहणाऱ्या प्रविण माळी याने अन्य पाच जणांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज प्रविण माळी आणि खुशबू परमार या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी त्या दोघांकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोपेड असा सुमारे ११ लाख १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून अन्य चार आरोपींचा शोध सुरु आहे.