घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर; वडणगेतील राजवाडा हॉटेलवर कारवाई
कोल्हापूर : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील वडणगे येथील ‘राजवाडा’ हॉटेलवर प्रशासनाने कारवाई करत सहा सिलेंडर जप्त केले असून हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा (नियमन) कायदा, १९५५ अंतर्गत घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी वापर करण्यास बंदी आहे. तरीही काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी विकास देसाई व सचिन लामखडे यांच्या पथकाने २५ मार्च रोजी रात्री छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या स्वयंपाकघरात १४.२ किलो क्षमतेचे सहा घरगुती एलपीजी सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी आढळून आले. हे सिलेंडर तात्काळ जप्त करण्यात आले असून करवीर पोलीस स्टेशन येथे हॉटेल मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व हॉटेल, लॉन, मंगल कार्यालये व कॅटरिंग व्यावसायिकांना केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर हा दंडनीय गुन्हा असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.