जोतिबा देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर गिरोली घाटात मधमाशांचा हल्ला...पाच जण जखमी

<p>जोतिबा देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर गिरोली घाटात मधमाशांचा हल्ला...पाच जण जखमी</p>

कोल्हापूर - जोतिबा देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज रविवार असल्याने देवदर्शनासाठी काही भाविक वारणा - कोडोली मार्गे गिरोली घाटातून प्रवास करत होते. काही प्रवासी गिरोली घाटात आल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावरील मधमाशांनी ये - जा करणाऱ्या भाविकांवर हल्ला चढवला. यामध्ये कोल्हापूरचे ओम राजेंद्र गुरव, जाखलेच्या अनिता धनाजी खोंद्रे, श्रेया संदीप खोंद्रे, धनाजी महादेव खोद्रे, केखलेचा रोहित कांबळे या भाविकांना मधमांश्यानी चावा घेतल्यामुळे जखमी झाले होते, या सर्वांना तात्काळ कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र ओम गुरव याला जास्त मधमाशा चावल्यामुळे त्याला सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद केली होती. झाडावरील मधमाश्याचे पोळे स्थानिक ग्रामस्थांनी काढल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली आहे. जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रा एक एप्रिल रोजी आहे, अवघ्या दहा दिवसावर ही यात्रा आली असताना भाविकांवर मधमाश्याकडून हल्ला झाल्याने वनविभागाने याची खबरदारी घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.