इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची ३ कोटी ३६ लाखांची फसवणूक... चौघांना अटक
इचलकरंजी - हिरेनकुमार बाबुलाल चोपडा यांचा इचलकरंजीत जिजामाता मार्केट परिसरात माताजी टेक्सटाईल मिल्स या नावाने कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. चोपडा आणि त्यांचे वडील बाबुलाल चोपडा मिळून हा व्यवसाय पाहतात. चोपडा हे इचलकरंजीतील कापड उत्पादकांकडून ग्रे कापड खरेदी करून राजस्थानमधील पाली, बालोत्रा, जोधपूर आदी भागातील व्यापाऱ्यांना विकतात.
नोव्हेंबर २०२३ मध्ये राजस्थानमधील अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग आणि रितीक अमरचंद गर्ग हे चोपडा यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी आपली मागानी जेठाजी टेक्सोफाईन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून तसेच जोधपुरात रामाकृष्ण मिल्स या नावाचे युनिट असल्याचे चोपडा यांना सांगितले. देशभर मोठ्या प्रमाणावर कापड व्यवसाय करत असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार नियमितपणे करतो, असे सांगत त्यांनी उधारीवर कापड देण्याची विनंती केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चोपडा यांनी एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत वेळोवेळी २ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपये किमतीचा ग्रे पांपलीन कापडाचा माल जोधपूर मधील त्यांच्या युनिटकडे पाठवला. ऑगस्ट २०२५ रोजी १ कोटी २५ लाख रुपयांचा धनादेश आणि आरटीजीएस फॉर्मचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून पैसे जमा करण्याचे आश्वासन त्यांनी हिरेनकुमार चोपडा यांना दिले. मात्र ठरलेल्या दिवशी पैसे जमा झाले नाहीत. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने केवळ २६ लाख ९७ हजार रुपये आरटीजीएसद्वारे दिले. तसेच २६ लाख २७ हजार रुपये किंमतीचा कापड माल परत केला. एकूण ५३ लाख २४ हजार ७४७ रुपये एवढी रक्कम मिळाली उर्वरित रक्कम घेण्यासाठी चोपडा आणि त्यांचे वडील राजस्थानातील बालोत्रा येथे गेले मात्र अनिरूध्द गर्ग टाळाटाळ करू लागला. त्यानंतर पैसे देणार नसल्याचे सांगत शिवीगाळ आणि दमदाटी केल्यानंतर चोपडा यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग आणि रितीक अमरचंद गर्ग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना राजस्थान मधून ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक साने याप्र करणी पुढील तपास करत आहेत.