शाहू कॉलेजजवळ मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग; लाखोंचे नुकसान
कोल्हापूर : सदर बाजार परिसरात शाहू कॉलेज नजीक असलेल्या एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे. या आगीत मंडप साहित्य, फायबरचे साहित्य आणि डेकोरेशनचा ऐवज जळून खाक झाला असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सचिन कांबळे, संदीप धनवंत, पवन चव्हाण आणि बबलू पाटील यांचा मंडप व डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यांचे हे गोडाऊन असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. आगीत मंडपासाठी लागणारे फायबर साहित्य व सजावटीचा मोठा साठा जळून गेला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या मोहिमेत अग्निशमन दलाचे जवान अमोल पाटील, माणिक कुंभार, सुनील यादव आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते.