पाटगावचे माजी सरपंच गेले कुठे..?
दोन महिन्यांपासून बेपत्ता असून पोलीस कोणतीच माहिती देत नाहीत : कुटुंबियांची भावना
कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, मात्र पिळणकर यांचे नेमके काय झाले हे समोर आलेले नाही. त्यामुळे पाटगावचे माजी सरपंच गेले कुठे..? असे प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत. बीडच्या मस्साजोग प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुनरावृत्ती तर झाली नाही ना...अशी शंका आता उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी पाटगाव भागात जळालेल्या अवस्थेत काही हाडं सापडली होती. मात्र त्याचा अहवाल येणं अजूनही बाकी आहे. ती हाडं एखाद्या जनावरांची असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी महेश पिळणकर यांच्याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे पिळणकर कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. मस्साजोगपेक्षाही पुढं गेलेलं हे प्रकरण असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सतिशचंद्र कांबळे यांनी म्हटलं आहे.