रंगपंचमी निमित्त वाहतूक शाखेची विशेष कारवाई; ३७० वाहनचालकांकडून ३ लाख १७ हजार १०० रुपयांचा दंड
कोल्हापूर : रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३७० वाहनचालकांवर कारवाई करून ३ लाख १७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
८ मार्च रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. रंगपंचमी निमित्त काही वाहनचालकांकडून हुल्लडबाजी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील विविध ठिकाणी फिक्स पॉइंट व पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आली होती. कारवाईदरम्यान ट्रिपल सीट वाहन चालविणे, परवाना जवळ न बाळगणे, प्रवेशबंद मार्गातून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, विहित नमुन्यात नंबर प्लेट नसणे तसेच कर्कश हॉर्न वाजविणे अशा विविध प्रकारच्या नियमभंगाबद्दल वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मात्रे तसेच पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली.