इचलकरंजीत कुख्यात पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावर छापा... 

ड्रग्जसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त 

<p>इचलकरंजीत कुख्यात पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावर छापा... </p>

इचलकरंजी - शहर परिसरातील कुख्यात पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या यड्रावमधील घरात शहापूर पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून 4 जिवंत काडतूसे , ८६५ ग्रॅम MD ड्रग्ससह, दुचाकी, चारचाकी आणि इतर साहित्य, असा तब्बल ३० लाख २२ हजार रुपयांचा  मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही मोठी कारवाई असून  मनीष नागोरी याच्यावर २१ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती  अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.

इचलकरंजी शहरात दोन दिवसांपूर्वी भरवस्तीत एका गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. यानुसार राज्यात पिस्तूल तस्कर म्हणून गाजलेला त्याचबरोबर विविध बंदुकीच्या प्रकरणात आणि दाभोळकर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनीष नागोरी याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान यड्राव परिसरातील प्रियदर्शनी हौसिंग सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेला  पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरामध्ये जिवंत काडतूसे  आणि अंमली पदार्थांचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहापूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास मनिष नागोरी याच्या घरात छापा टाकला.

यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या चारचाकीची झडती घेतली असता  मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा मिळून आला. मनीष नागोरी  याच्यावर शस्त्र अधिनियम कलमासह गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कलमान्वये शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक महावीर कुटे हे करत आहेत.  ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, बबन माळी, स्वाती झुगर, प्रमोद भांगरे,  पोपट भंडारे, रामदास गायकवाड, गजानन कोष्टी, अमोल खोत, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, सतिश कुंभार, रोहीत डावाळे, प्रणिता केटकाळे यांच्या पथकाने केली आहे.