इचलकरंजीत पेट्रोल पंपाजवळ मोटारीचा अपघात...
मोटारीने घेतल्या तीन पलट्या
इचलकरंजी - इचलकरंजी शहरात पेट्रोल पंपाजवळ मोटारीचा अपघात झाला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार थेट दुभाजकावर आदळली आहे. या धडकेत मोटारीने सलग तीन पलट्या घेतल्याने मोठा अपघात झाला आहे.
भरत जैन हे शिवतीर्थ परिसरातून छत्रपती शाहू महाराज पुतळ्याच्या दिशेने मोटारीने जात होते. मेन रोडवरील दुभाजकाजवळ आल्यानंतर अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि मोटार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मोटारीने सलग तीन पलट्या घेतल्या आणि रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. अपघातानंतर काही क्षणांतच वाहनातून धूर निघू लागला. त्यानंतर तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला वाहनातून बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत अग्निशमन दलाला आणि पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
प्राथमिक अंदाजानुसार वेग आणि नियंत्रण सुटणे हे अपघाताचे मुख्य कारण होते. या अपघातात चालक भरत जैन हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाल आहे. या घटनेमुळे काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.