धुळवड न दिल्याने इचलकरंजीत हुल्लडबाजांकडून वाहनांची तोडफोड...
इचलकरंजी - शहरात होळी सणानिमित्त मुले रस्त्यावरून ये - जा करणारी वाहने अडवून वाहनधारकांकडून धुळवड मागतात. काही वाहनचालक स्वखुशीने धुळवड अर्थात पैसे देतात. मात्र काही हुल्लडबाज तरूणांमुळे सोमवारी या सणाला गालबोट लागले. धुळवड न दिल्याने दोन ट्रॅव्हल्स, दोन आयशर टेम्पो, दोन एसटी बस आणि एका स्कूल बसवर हुल्लडबाज तरूणांनी राखेचे गोळे आणि दगडफेक करून तोडफोड केली आहे. यावेळी राखेचे गोळे लागल्याने काही जण जखमी झाले आहेत. गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांनी हुल्लडबाज तरूणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून सक्त सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, शहरातील जवाहरनगर परिसरात धुळवड दिली नसल्याच्या कारणावरून एका तरुणाला अल्पवयीन मुलांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून पोलिस पुढील तपास करत आहेत.