गंगावेशीत वृद्ध महिलेचा खून; दागिन्यांसाठी नातवाकडून विषप्रयोग
कोल्हापूर : गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर तालीम शेजारील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय ७२) यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला असून, दागिन्यांच्या हव्यासापोटी नातवानेच त्यांना विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी प्रेम परशूराम भिऊंगडे याला अटक केली आहे.
उषा भिऊंगडे या तीन महिन्यांपूर्वी पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. त्यांना अपत्य नव्हते. फुलेवाडी येथे राहणारे त्यांचे पुतणे परशूराम भिऊंगडे हे दररोज त्यांना औषधे देण्यासाठी येत असत. रविवारी रात्रीही त्यांनी औषध देऊन भेट दिली होती. सोमवारी सकाळी बाहेरगावी गेल्याने ते येऊ शकले नाहीत. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता उषा भिऊंगडे बेडरूममध्ये निपचित अवस्थेत आढळल्या. याबाबतची माहिती लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे येथे देण्यात आली. त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक अंदाज नैसर्गिक मृत्यूचा होता. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू ठेवला. मृतांच्या अंगावरील काही सोन्याचे दागिने गायब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय बळावला. तांत्रिक माहितीच्या आधारे मृतांचा नातू प्रेम सोमवारी फ्लॅटवर येऊन सुमारे पाऊण तास थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
प्रेमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने टोलवाटोलवी केली; मात्र पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण व सहायक निरीक्षक सागर वाघ यांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रेम व त्याचे वडील घरीच सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. त्याच कामासाठी वापरली जाणारी विषारी पावडर त्याने चहात मिसळून आजीला पाजली. त्या बेशुद्ध झाल्यानंतर सहा पाटल्या, दोन सोनसाखळ्या व कर्णफुले असा ऐवज चोरल्याचे त्याने कबूल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलिस करत आहेत.