गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह एकास अटक; शाहूपुरी पोलीसांची मार्केट यार्ड परिसरात कारवाई
कोल्हापूर – शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणास गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूसासह अटक केलीय. ही कारवाई बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मार्केट यार्ड परिसरात करण्यात आली. राकेश किरण कारंडे (वय 35, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गाडी खरेदी-विक्री व्यवसाय करतो.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी मार्केट यार्ड परिसरात येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी रामकृष्ण हॉल समोरील रस्त्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक गावठी बनावटीची स्टील पिस्टल (काळ्या रंगाची मुठ असलेली) मॅगझिनसह व ‘KF 7.65’ असे नमूद असलेले एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 52 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान, राकेश कारंडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी राजारामपुरी आणि गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.