इचलकरंजीत मित्रांमधील हाणामारीत एकाचा मृत्यू...तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी
इचलकरंजी - शहरात शहापूर परिसरातील आवळे मळा परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास मद्यापान करण्यास बसले असता मित्रांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. यावेळी शाबाज शेख याने आसिफ जिल्लाणी यलकुंद्री याच्या वडिलांना फोनवरून शिवीगाळ केलीय. याचा राग मनात धरून आसिफ जिल्लाणी यलकुंद्री याने मित्र सोहेल सनदी आणि त्याचा आत्ते भाऊ आखिल मुजावर यांना सोबत घेऊन शाबाज शेख याच्याशी वाद घालत त्याला दगडाने ठेचून गंभीर जखमी केले. यामध्ये सांगलीतील तेवीस वर्षीय शाबाज शब्बीर शेख हा तरुण मयत झाला आहे. याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासांत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज आसिफ जिल्लाणी यलकुंद्री, सोहेल सनदी आणि आखिल मुजावर यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.