मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कोल्हापूरात कारवाईची मोहिम
वाहतूक शाखेची विशेष मोहीम ४०९ वाहनचालकांवर कारवाई
कोल्हापूर - शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १८ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजेपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी शिवाजी पुलाजवळ तसेच इतर प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून व्यापक कारवाई केली.
या कारवाईत ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, म्युझिकल आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर, प्रवेशबंद मार्गातून वाहन चालवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, वाहनांमध्ये बेकायदेशीर मॉडिफिकेशन तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसणे या कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेत ४०९ वाहनचालकांवर कारवाई करत साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. डुप्लिकेट सायलेंसर आणि कर्णकर्कश हॉर्न असलेली सुमारे ३२ वाहने ताब्यात घेऊन वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम पुढंही सुरू राहणार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.