कोल्हापुरात पत्नीच्या खून प्रकरणी पतीला अटक
कोल्हापूर – शहरातील सोन्य मारूती चौकात राहणाऱ्या गणेश शंकर हुबाळे याचा सात फेब्रुवारी रोजी पत्नी स्वाती हिच्याशी वाद झाला होता. या वादातून त्याने पत्नीचा गळा आवळुन खून करण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत स्वातीला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आज तिचा मृत्यु झाला आहे.
स्वातीचे भाऊ प्रवीण भाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही तपास सुरू केला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीने पळून गेलेला गणेश हा सीपीआर जवळील एका हॉटेलच्या परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीसांनी सापळा रचून गणेशच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौकशीत त्याने घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित गणेशला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.