गंगावेश परिसरातल्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेचा संशयास्पद आढळला मृतदेह...
कोल्हापूर – शहरातील गंगावेश परिसरातल्या ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भुईगडे या वृद्ध महिलेचा आज सकाळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिमान इनामदार यांनी नेहमीप्रमाणे त्यांना चहा आणि नाश्ता देण्यासाठी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळ प्रतीक्षा करूनही दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर चावीच्या सहाय्याने दरवाजा उघडण्यात आला.
घरात प्रवेश केल्यानंतर उषा भुईगडे या बेडवर झोपलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता त्या प्रतिसाद देत नव्हत्या. या घटनेची माहिती तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीराम कनेरकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
प्राथमिक तपासणीदरम्यान मृत महिलेच्या शेजारी लोखंडी पकड आढळून आल्याने हा घातपात आहे की हृदय विकाराने झालेला मृत्यू आहे, अशी शंका व्यक्त केली जात होती. पोलिसांनी तात्काळ श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केले. पोलिसांनी घरातील प्रत्येक भागाची तपासणी केली. घरातील साहित्य विस्कळीत नसल्याचे आढळले. जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतंही चिन्ह दिसून आले नाही. दोन महिन्यापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या घरामध्ये एकट्याच रहात होत्या.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. तसेच शेजाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. मात्र तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अंतिम निष्कर्ष वैद्यकीय अहवालानंतरच काढता येणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कनेरकर यांनी सांगितले. पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलिस करत आहेत.