हुपरीत वाढती गुन्हेगारी चिंताजनक...

<p>हुपरीत वाढती गुन्हेगारी चिंताजनक...</p>

कोल्हापूर -  तेरा फेब्रुवारीच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला रामचंद्र खांडेकर हे हुपरी शहरातील माळभाग परिसरातील विशाल नगर मधील ओपन स्पेसमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी दोन दुचाकीस्वारांनी रामचंद्र खांडेकर यांना पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये खांडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मैदानाच्या कोपऱ्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणारे काही गुंड प्रवृत्तीचे टवाळखोर नेहमी बसत असतात. त्यांच्याकडूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खांडेकर यांना जखमी करून हे हल्लेखोर पसार झाले असून या घटनेनंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. हल्लेखोरांनी खांडेकर यांचा पाठलाग करून त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याचे दिसते आहे. यासंबंधी स्थानिक नागरिकांनी हुपरी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकाराची चौकशी करून संशयितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुरेश इंग्रोळे, नानासाहेब भोसले, माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांचेसह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे हुपरी परिसरात कायद्याचा धाकच उरला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.