अनैतिक संबंधातून महिलेचा खून... प्रवीण चिंचेवाडी याला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

<p>अनैतिक संबंधातून महिलेचा खून... प्रवीण चिंचेवाडी याला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई</p>

कोल्हापूर - अकरा फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज तालुक्यातील महागाव हद्दीतील ओढ्यात अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचा मृतहेद आढळून आला होता. या महिलेचा मृतदेह वन्यप्राण्याने खाल्ल्याच्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

 नातेवाईकांनी मृत महिलेच्या अंगावरील वस्तू ओळखल्यामुळे मृतदेह सुनीता संजय केसरकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. भडगावात राहणाऱ्या मयत सुनिता यांच्या अंगावरील दागिने गायब असणे आणि इतक्या निर्जन स्थळी मृतदेह सापडणं, यावरुन हा घातपात असण्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे निर्देश दिले. यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. तपासात सुनीता केसरकर यांचे गावातील प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी याच्याशी पाच ते सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते, अशी माहिती समोर आली.

 या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित प्रवीण चिंचेवाडी याला भडगावमधून ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली. प्रवीणचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून तो मयत सुनीता यांना भेटायला टाळाटाळ करत होता. त्यामुळे त्यांनी प्रवीणला त्यांच्या मधील संबंधांविषयी नातेवाईकांना माहिती देण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून आणि संसार उध्वस्त होईल म्हणून अठरा जानेवारी रोजी निर्जन स्थळी भेटायला बोलवून सुनीता यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली प्रवीणने दिली आहे.