दौलतवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा महिलांवर हल्ला...
दोघी जखमी
कोल्हापूर - कागल तालुक्यातील दौलतवाडी येथे सकाळी गावातील विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांवर शेजारच्या शेतातून अचानक आलेल्या कोल्ह्याने हल्ला केला आहे. बेसावध अवस्थेत असलेल्या महिलांच्या हात-पायांना चावा घेतल्याने महिला जखमी झाल्या आहेत. महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलांची सुटका केली. जखमी महिलांना मुरगूडमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असतानाही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वन्यप्राण्यांपासून लोकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाची असून, याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थ संबंधित विभाग, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करणार आहेत.