अमानुष मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू?; पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

<p>अमानुष मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू?; पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह</p>

चंदगड - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका गावात गाडीला बांधून फरफटत नेल्यानंतर व अमानुष मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पोलिस प्रशासन मात्र अद्याप निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

ही घटना चंदगड तालुक्यातील लक्कीकाटे गाव परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती समजून येत आहे. गवताच्या गंजीला आग लावल्याच्या संशयावरून संबंधित व्यक्तीला मोटारसायकलला दोरीने बांधून ओढत नेण्यात आले, तसेच त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. या घटनेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मृत व्यक्तीचे नातेवाईक पोलिस ठाण्यात गेले असता, मृत्यूची नोंद “आकस्मिक मृत्यू” म्हणून करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांकडून कसून तपास न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या शरीरावर निर्घृण मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, नखं उपटल्याचे तसेच त्याला वाहनाला बांधून फरफटत नेल्याचे स्पष्ट संकेत दिसून येतात. ही घटना घडत असताना काही नागरिकांनी तात्काळ 112 क्रमांकावर माहिती न दिल्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे समाजातील मानवी संवेदनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, संशयित आरोपी देशसेवेत, सैन्य दलाशी संबंधित असल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे मत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे