शाहू मिल चौकात भीषण अपघात; वडील-मुलीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

<p>शाहू मिल चौकात भीषण अपघात; वडील-मुलीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी</p>

कोल्हापूर : शहरातील अत्यंत गजबजलेल्या शाहू मिल ते कोटीतीर्थ रोडवर शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारने तीन मोपेडना जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात भाग्यश्री लक्ष्मण वंशे-गवळी (वय ३०, रा. कसबा बावडा) आणि दीपक महादेव वंशे (वय ६५, रा. दिलबहार तालीम, सनगर गल्ली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत भाग्यश्री वंशे-गवळी आणि दीपक वंशे हे वडील-मुलगी असून दीपक हे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. भाग्यश्रीचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला होता आणि ती सध्या कसबा बावडा येथे राहत होती.

अपघातात कैवल्य उदय नाईक आणि धनंजय करंजकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात क्रेटा कारने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दूर फेकले गेले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. धडकेनंतर क्रेटा कार रस्त्याच्या मधोमध उलटली होती, तर दुचाकीचा चक्काचूर झाला होता.

क्रेटा कार मयुरेश पाटील (वय १९, रा. राजारामपुरी ८ वी गल्ली) हा चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पलटी झालेली कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेनंतर परिसरात बघ्यांचा मोठा जमाव जमला होता. घटनेचा राजाराम पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.