गांजा विक्री प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक...
कोल्हापूर - शिये ते कसबा बावडा रस्त्यावर एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा रचून पोलिसांनी कर्नाटक - गोकाक येथील आणि सध्या शिवाजी पार्क झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नईम अब्बास खोजा याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ किलो ८०० ग्रॅम गांजा आणि मोबाईलसह एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित नईम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.