मुरगूडचा नगरअभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात...
कोल्हापूर - मुरगूड नगरपरिषदेत कार्यरत असणारा नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई याने हुपरी नगरपरिषदेत कार्यरत असताना पूर्ण झालेल्या कामांचे एम.बी. रजिस्टर मंजूर करून देण्यासाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. देसाई याने दीड लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून यापूर्वी देसाई याने ५० हजार रुपये स्वीकारल्याचा दावाही तक्रारदाराने केला आहे.
तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ जानेवारी रोजी पडताळणी केली. तडजोडी अंती ठरलेल्या १ लाख ३० हजार रुपये लाच रक्कमेतील पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये मुरगूड बसस्थानकात तक्रारदारांकडून स्विकारताना नगरअभियंता प्रदीप देसाईला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्याकडील वाहनाची झडती घेत त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. देसाईच्या घराचीही झडती घेण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले आहे.
लाचखोर नगरअभियंता प्रदीप देसाई विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे देसाई याच्यावर मुरगूड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नगरपरिषदांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, लाचखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलाय. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.