जयंती, उत्सव आणि निवडणुकीच्या मिरवणुकीत चोरीच्या दुचाकी... एकाला अटक
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील राहणाऱ्या महेश सुर्वे यांच्या दारातील दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना राजाराम बंधाऱ्यावरून दोघे जण चोरीच्या दुचाकी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून शिये येथील अभिषेक कुरणे याला अटक केली आहे.
कुरणे याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने जयंती, उत्सव आणि निवडणुकीत सायलेन्सर काढून फिरवण्यास भाड्याने गाड्या देण्यासाठी दहा दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. कुरणे यांने भुये, भुयेवाडी लाटवडे, वडगाव, घुणकी, टोप इथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या १ लाख ६४ हजार रुपये किमतींच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.