घरफोडी करणारी टोळी इस्पुर्ली पोलिसांनी केली जेरबंद...अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर - इस्पूर्ली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी संतोष बळवंत पाटील यांच्या मालकीची स्प्लेंडर मोटार सायकल १९ ते २० मे २०२४ दरम्यान चोरीस गेली होती. या गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी ऋषीकेश ऊर्फ गणेश उमेश पाटील आणि अक्षय चंद्रकांत पाटील यांना अटक करण्यात आली होती. मात्र संशयित आरोपी सुहास ऊर्फ स्वप्निल नामदेव चव्हाण हा पसार होता. इस्पूर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला पुणे येथे कोंबिंग ऑपरेशनदरम्यान ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह सन २०२३ आणि २०२४ या कालावधीत आजरा, भुदरगड, राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काजू फॅक्टऱ्यांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली. या टोळीने सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा कच्चा आणि तयार काजू माल चोरी करून तो कराड येथील फॅक्टरीत विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात मंदार कदम, अजय शिंदे, स्वागत लोकरे, राजू ऊर्फ विशाल असणेकर आणि अक्षय जगताप यांचा सहभाग होता.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम १ लाख १० हजार रुपये, एक चारचाकी आणि दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीशी संबंधित करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एकूण सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. इस्पुर्ली पोलिस पुढील तपास करत आहेत.