अल्पवयीन परप्रांतीय मुलीवर अत्याचार... संशयिताला पोलिस कोठडी
कोल्हापूर – शहरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात प्रेम सचिन हेगडे हा त्याच्या कुटुंबियासमवेत राहतो. एका अल्पवयीन परप्रांतीय मुलीला हेगडे याने गुरुवारी आठ जानेवारी रोजी जीवे मारण्याची धमकी देऊन शिंगणापूर नजीक एका शेतवडीत नेवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. पुन्हा शनिवारी त्याने पीडितेला मनेर मळा परिसरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांसह इतरांनी शनिवारी रात्री हेगडे याला अटक करण्याची मागणी करत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा जमाव जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी तात्काळ लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन संतप्त जमावाला शांत करत संशयित आरोपी हेगडे याला अटक केल्याची माहिती दिली. यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. संशयित हेगडे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड अधिक तपास करत आहेत.