कोल्हापुरात गॅस स्फोटात तिघांचा मृत्यू : दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, एकास दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस पाईप लाईन मधील स्फोट दुर्घटनेत भोजने कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी अटक केलेल्या महमदहुजेर हुजेरअली या संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
याबाबतची माहिती अशी, अमर भोजने हे आपल्या कुटुंबासह मनोरमा कॉलनीमध्ये राहत होते. सोमवारी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी गॅस पाईप लाईनची जोडणी करण्यात आली होती. दरम्यान, रात्री उशिरा भोजने यांच्या घरी गॅसचा स्फोट होवून त्यामध्ये त्यांचे वडील अनंत, पत्नी शीतल, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेत शीतल, अनंत आणि प्रज्वल यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
दरम्यान, गॅस पाइपलाइन जोडणी करताना हलगर्जीपणा झाला. त्यामुळे गॅस गळती होवून स्फोट घडला असल्याचं फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात स्पष्ट झालंय. त्यानुसार पोलिसांनी एचपी ऑईल कंपनीचे विभाग प्रमुख गौरव भट,अभियंता हरीश नाईक, सतीमाता या देखरेख ठेवणाऱ्या कंपनीचा प्रमुख अमोल जाधव आणि कर्मचारी महंमदहुजेर हुजेरअली यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. यातील कर्मचारी महंमदहुजेर हुजेरअली याला जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलीय. त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. अन्य तीन आरोपींचा शोध सुरूय अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलीय.
दरम्यान या गॅस स्फोटातील जखमी तीन वर्षांची इशिका हिच्यावर सद्या उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होतीय.