दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाला ईमेल द्वारे धमकी

<p>दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाला ईमेल द्वारे धमकी</p>

नवी दिल्ली - आज शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या ईमेल आयडीवर एक धमकीचा संदेश प्राप्त झालाय. "दुपारच्या नमाजानंतर न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये स्फोट होईल. तीन ठिकाणी स्फोटके ठेवण्यात आली आहेत."  असं या ईमेलमध्ये नमूद केलंय. ईमेलमध्ये पाकिस्तान आणि तामिळनाडूचा उल्लेख असून ईमेल "kanimozhi.thevidiya@outlook.com" या आयडी वरून पाठवला गेलाय. यामुळे तातडीने कोर्ट परिसर रिकामा करण्यात आला असून वकील, न्यायाधीश व कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आलंय. बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि एनएसजी यंत्रणा घटनास्थळी दाखल असून संपूर्ण इमारतीची झडती सुरूय.

दिल्लीतील प्रकारानंतर मुंबई उच्च न्यायालयालाही अशाच स्वरूपाचा धमकीचा ईमेल प्राप्त झालाय. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण न्यायालय तातडीने रिकामं करण्यात आलं असून, कोर्टामध्ये मोठी खळबळ उडालीय. मुंबई पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आलाय. अद्याप धमकी खरी की खोटी हे स्पष्ट झालेलं नाही.

"२०१७ पासून आमचे लोक पोलिसांमध्ये घुसले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या स्फोटामुळे मागील खोटे दावे स्पष्ट होतील. दुपारच्या नमाजानंतर स्फोट होईल." असं ईमेल मध्ये म्हटलंय. हा मजकूर अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, सुरक्षा यंत्रणांनी याची पूर्ण चौकशी सुरू केलीय.