सर्किट बेंचच्या कामकाजासाठी अधिकारी आणि कर्मचारी हजर...
सर्किट बेंच उद्घाटनाची जोरदार तयारी

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सोमवार १८ ऑगस्ट पासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. रविवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. सर्किट बेंचसाठी ६८ प्रशासकीय अधिकारी आणि १२५ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलीय.
१९३ जणांच्या नियुक्तीचा आदेश सोमवारी जारी करण्यात आलाय. आत्ता पर्यंत सुमारे सव्वादोनशे अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती झालीय. आता न्यायमूर्तीच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती केली जात आहे. सोमवारी काही वरिष्ठ अधिका-यांसह २४ कर्मचारी सर्किट बेंचमध्ये रुजू झाले आहेत. नव्याने नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी तातडीने हजर होणार आहेत. यात उपरजिस्ट्रार, न्यायमूर्तीचे खासगी सचिव, सहायक रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर यासह लिपिक, स्टेनोग्राफर, शिपाई अशा कर्मचा-यांचा समावेश आहे. सर्किट बेंचकडे वर्ग केलेल्या खटल्यांची कागदपत्रे आणायला सुरुवात झालीय. आलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून त्यांचे डिजिटल डॉक्युमेंटेशन केले जात आहे. सद्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तीन उपरजिस्ट्रार, १५
न्यायमूर्तीचे सचिव, चार सहायक, २८ सहायक सेक्शन ऑफिसर, सत्तर लिपिक, ४१ शिपाई आणि एका लिफ्टमन आणि ग्रंथपालाची तर दोन चोपदारांची नियुक्ती करण्यात आलीय. चार स्टेनोग्राफर, एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर, तीन बायंडर, दोन फायलर यांची नियुक्ती करण्यात आलीय. सीपीआर समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत सुरू होणाऱ्या या सर्किट बेंचसाठी गेली महिनाभर शेकडो कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. इमारतीची डागडूजी, रंगकाम, विजेची कामे अंतिम टप्प्यात आहे. इमारतीच्या परिसरातील रस्ते नव्याने डांबरीकरण करण्यात आलेत. हा परिसर रविवारनंतर नो पार्किंग आणि नो हॉकिंग झोन असणार आहे. त्या दृष्टीने संबंधितांना सूचना देण्यात आल्यात. उद्घाटनानंतर मान्यवर मेरी वेदर मैदानात उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यासाठी मेरी वेदर मैदानात प्रशासनाच्यावतीने भव्य मंडप उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कर्मचारी मंडप व्यवस्था, साऊंड सिस्टिम, लाईटची व्यवस्था, बैठक व्यवस्था या कामात व्यस्त आहेत.