सर्किट बेंचच्या उद्घाटन सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार

कोल्हापूर - १८ ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार आहे. यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सीपीआर समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीत डागडुजी आणि दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
उद्घाटन सोहळा १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सीपीआर समोरील जुन्या इमारतीत होणार आहे. उदघाटनानंतर मान्यवर, मेरी वेदर मैदानावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले आहे.
या पत्रकार बैठकीला अॅड.तुकाराम पाडेकर, मनोज पाटील, सुरज भोसले, प्रमोद दाभाडे यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व आजी - माजी पदाधिकारी उपस्थित होते.