नोटांची थप्पी घरी सापडलेल्या न्यायमूर्तींनी राष्ट्रपतींकडे दिला राजीनामा 

<p>नोटांची थप्पी घरी सापडलेल्या न्यायमूर्तींनी राष्ट्रपतींकडे दिला राजीनामा </p>

नवी दिल्ली – दिल्लीत एका न्यायमूर्तींच्या घरी अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना तिथे नोटांची थप्पी दिसली. यावेळी रोख रक्कमेच्या नोटा जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्याच न्यायमूर्तींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे आज दिला आहे. 
यशवंत वर्मा असे त्या न्यायमूर्तींचे नाव असून या रक्कमांच्या घटनेमुळे त्यांची बदली दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव संसदेत मांडला. हा प्रस्ताव स्वीकारून, लोकसभेच्या अध्यक्षांनी तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली. न्यायमूर्ती वर्मा यांनी या समितीच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि समितीला आपली चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर, वर्मा यांनी समितीसमोर हजर होऊन आपली बाजू मांडली होती. हे सर्व सुरु असताना त्यांनी आता राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.