इच्छामरणावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय...

उपचार थांबवण्यास दिली परवानगी  

<p>इच्छामरणावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय...</p>

नवी दिल्ली - इच्छामरण प्रकरणाच्या याचिकेच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे.  गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या ३२ वर्षीय हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने उपचार थांबवून मृत्यू पत्करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हरीश यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. 
गेल्या १३ वर्षांपासून हरीश राणा हे कोमात आहे त्यांच्या उपचारासाठी कुटुंबियांना घरदार विकावे लागले तरीही उपचाराचा खर्च काही भागेना. यासाठी  हरीश यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. या याचिकेच्या  सुनावणीवर  २०१८ मध्ये न्यायालयाने 'निष्क्रिय इच्छामरणा'ला कायदेशीर मान्यता दिली होती, पण त्यातील काही तांत्रिक बाबी स्पष्ट नव्हत्या. आज न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा संवेदनशील निकाल दिला. 
हरीश राणा यांची प्रकृती सुधारणे अशक्य असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत होते. मात्र, त्‍यांना केवळ नळीद्वारे अन्न दिले जात होते. २०१८ च्या नियमांनुसार केवळ व्हेंटिलेटरसारखी कृत्रिम जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्याची तरतूद होती, पण 'फीडिंग ट्यूब'बाबत स्पष्टता नसल्याने रुग्णालय प्रशासनासमोर अडचण निर्माण झाली होती.याच तांत्रिक अडचणीमुळे हरीशच्या पालकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज हरीशवर सुरू असलेले वैद्यकीय उपचार थांबवण्याचे आदेश दिले, ज्यामुळे त्याला सन्मानाने मृत्यू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.