कोल्हापुरात महिला वकीलावरील हल्ल्याचा जिल्हा बार असोसिएशनकडून निषेध

वकीलांचे आजपासून काम बंद आंदोलन

<p>कोल्हापुरात महिला वकीलावरील हल्ल्याचा जिल्हा बार असोसिएशनकडून निषेध</p>

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात शनिवारी एका महिला पक्षकाराने महिला वकीलाला मारहाण केल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हा बार असोसिएशनची तातडीची सभा घेण्यात आली. सभेत वकिलांनी आपली भूमिका मांडत पोलिस प्रशासनावर टीका केली.

अॅड. विद्या देशमुख यांनी न्यायालय परिसरात तैनात असलेल्या पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित पोलिसांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. अॅडव्होकेट स्वाती तानवडे यांनी या घटनेच्या निषेधार्थ हल्लेखोर महिला पक्षकाराचे कुणीही वकीलपत्र घेऊ नये, तसेच वकीलांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घ्यावा अशी भूमिका मांडली. अॅडव्होकेट शिल्पा सुतार यांनी जिल्हा सत्र न्यायालयातच महिला वकीलावर अन्याय होत असेल तर जिल्ह्यातील इतर महिलांना न्याय कसा मिळणार, असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.

 यावेळी अॅड. गौतम पोवार यांनी, या प्रकाराचा निषेध करत स्वसंरक्षणासाठी वकिलांना हत्यार बाळगायला परवानगी देण्याचा ठराव करण्याची मागणी केली. दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेकर यांनी घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्या महिला वकील वाद सोडवायला पुढं आल्या नाहीत, असे वक्तव्य केल्यानंतर सभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले भाषणे नकोत, ठोस निर्णय घ्या, अशी मागणी करत काही वकिलांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी उपस्थितांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण गोंधळ कायम राहिला. अखेर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन अॅडव्होकेट विवेक घाटगे यांनी महिला वकीलांवर हल्ल्याच्या निषेधार्थ आजपासून कामबंद आंदोलन करु असे जाहीर केले.

सभेनंतर सर्व वकिलांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात एकत्र येत घोषणाबाजी केली. यानंतर संतप्त वकीलांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी यासंदर्भात माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करु असे आश्वासन दिले.

 या प्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही. आर. पाटील, महिला प्रतिनिधी अॅडव्होकेट मनिषा सातपुते, माजी अध्यक्ष सर्जेराव खोत, प्रकाश मोरे, रणजित गावडे, अजित मोहिते तसेच अॅडव्होकेट अरुण पाटील, अॅडव्होकेट सागर घोरपडे, अॅडव्होकेट गुरुदत्त पाटील उपस्थित होते.