उच्च न्यायालय सर्किट बेंच आंदोलन प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष मुक्त

<p>उच्च न्यायालय सर्किट बेंच आंदोलन प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष मुक्त</p>

कोल्हापूर – कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच व्हावे यासाठी गेली सुमारे ३५ वर्षे सुरू असलेल्या लढ्याशी संबंधित आत्मदहन आंदोलन प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल लागला. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज रजपूत यांनी सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

१५ ऑगस्ट २०१५ रोजी सर्किट बेंचच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आत्मदहन आंदोलनात अॅड. विवेकानंद घाटगे, अॅड. कुलदीप कोरगावकर, अॅड. पांडुरंग दळवी, अॅड. समीउल्ला पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, उदय लाड, सलीम पाच्छापुरे आणि मनीषा नाईक यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन खटला कोल्हापुरातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित होता. दरम्यान, सर्किट बेंचच्या मागणीसाठी कोल्हापुरातील वकिलांसह सर्वसामान्य नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. सहा जिल्ह्यांतील नागरिकांसाठी ही मागणी अत्यंत जिव्हाळ्याची मानली जात होती. आंदोलनाला दहा वर्षे पूर्ण होऊनही खटला प्रलंबित असल्याने याबाबत विविध स्तरांत चर्चा सुरू होती.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने तपास अधिकारी, पंच तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. त्यानंतर आरोपींतर्फे अॅड. प्रकाश मोरे, अॅड. शैलाजा चव्हाण आणि अॅड. वीरेंद्रसिंह निंबाळकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने सादर पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. या निकालानंतर वकील संघटना व आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.