इंदापूर ऊस आंदोलन प्रकरणी २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता

<p>इंदापूर ऊस आंदोलन प्रकरणी २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता</p>

इंदापूर -  इंदापूर येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलन प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एकूण ८ गुन्ह्यांपैकी ३ गुन्ह्यांतून २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह सतिशभैय्या काकडे, सदाभाऊ खोत, निलेश देवकर यांचा समावेश आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी -
२०१२ साली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिटन २७०० रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर केला नव्हता. त्यावेळी राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हस्तक्षेप करून तोडगा काढावा, या मागणीसाठी कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर सोलापूर–पुणे मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि आंदोलनाची तीव्रता वाढली. या आंदोलनात कुंडलिक कोकाटे हा तरुण शेतकरी शहीद झाला. त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

आंदोलनाचा परिणाम -
सुमारे आठवडाभर चाललेल्या संघर्षानंतर राजारामबापू साखर कारखान्याने प्रतिटन २५०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आणि उसदराचा तिढा सुटला. राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या आंदोलनामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन सुमारे ३०० रुपये जादा दर मिळाला.

न्यायालयीन प्रक्रिया-
इंदापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. फारूकी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. ॲड. एन. जे. शहा, ॲड. महेश ढुके आणि ॲड. श्रीकांत करे यांनी या प्रकरणात विनामूल्य न्यायालयीन कामकाज पाहिले.