गडहिंग्लजमध्ये ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन

<p>गडहिंग्लजमध्ये ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन</p>

कोल्‍हापूर – जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर येथे जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांची  प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी, गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला वाढती मागणी असल्याने म्हैस दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. अमूल डेअरीला टक्कर द्यायची असेल तर आपले दूध संकलन वाढलेच पाहिजे. २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार, असे म्हणाले.

या उद्दिष्टासाठी गोकुळच्या विविध अनुदान योजना, वासरू संगोपन, केडीसीसी बँकेमार्फत कर्जपुरवठा, जातिवंत म्हैस केंद्रे आणि लाडका सुपरवायझर योजना सुरू करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दर महिन्याला दूध संकलन, विक्री आणि सुपरवायझर यांच्या कामाचा अहवाल घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांना म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहित करून केडीसीसी बँकेची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

लिंगनूर परिसरातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने जातिवंत म्हैस विक्री केंद्र येथे उभारण्यात आले आहे. एन.डी.डी.बी. यांनी मुंबई येथे गोकुळसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी एन.डी.डी.बी.चे प्रतिनिधी यांना केली. डिबेंचर संदर्भात संचालक मंडळाने विशेष समिती स्थापन केली असून, डिबेंचरमुळे संस्थेचे भांडवल बळकट होते आणि व्याज उत्पन्न मिळते. समितीने अहवाल सादर केल्यानंतर संचालक मंडळाने दूध संस्थांच्या मतानुसार पुढील निर्णय घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “गोकुळ ने नेहमीच उत्पादकांचे हित जोपासले आहे. त्याचा एक भाग म्हणून जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारले आहे. गोकुळने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली आहे. गोकुळच्या या उपक्रमामुळे उत्पादकांचे हित संरक्षित राहणार असून, दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, तसेच शहरी–ग्रामीण भागामधील आर्थिक समन्वय वाढेल.

आ. सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाचे दूध संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन जनावरे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे गोकुळने जातिवंत म्हैस खरेदी–विक्री केंद्र चालू केले आहे. दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो. त्याकडे नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे. आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांमध्ये म्हैस दूध संकलनाचे प्रमाण जास्त आहे. जातिवंत म्हैस खरेदीवर ३० टक्के अनुदान गोकुळ उत्पादकांना मिळते. आतापर्यंत १८ लाख ११ हजार लिटर दूध संकलन पार केले आहे.

            संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले,  गेल्या चार वर्षामध्ये १४ रुपये म्हैस व १० रुपये गाय दूध खरेदी दरात वाढ केले आहे. संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा आहे आणि गोकुळ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”  या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक  मंगल खन्नुकर, कोवाड, वैभव बुगाडे, गिजवणे, गजेंद्र बिरंबोळे, मडिलगे, शिवाजी हूनगीनाळे बटकणंगले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्‍वागत एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.सरोज वाहणे व प्रास्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले तर आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले.