दौलत कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना

<p>दौलत कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना</p>

कोल्हापूर - चंदगड तालुक्यातील ओसाड माळावर उभा राहिलेला दौलत साखर कारखाना म्हणजेच येथील शेतकऱ्यांचे स्वप्न होते. या उभारणीनंतर ही 'दौलत' त्यांचीच आहे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटू लागले. त्यानंतर १९९७ च्या सुमारास कारखाना विस्तारीकरण आणि पार्टीकल बोर्ड प्रकल्पासाठी म्हणून तत्कालीन संचालक मंडळाने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळा (एनसीडीसी) कडून कर्ज घेतले होते. पण हा कारखाना फायद्यात न चालल्याने कारखान्याच्या अधोगतीला तिथूनच सुरवात झाली. कारखाना काही वर्षातच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. २०१९ साली जिल्हा बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिला. कोल्हापूरातील अथर्व इंटरट्रेड कंपनीने १६२ कोटींच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारून ३९ वर्षांच्या कराराने हा कारखाना भाडे तत्त्वावर चालवायला घेतला. पाच वर्षे त्यांनी कारखाना उत्तमरीत्या चालवला, मात्र या काळात त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. प्लायवूड उद्योगासाठी घेतलेले १८ कोटी ८ लाख ९५ हजार रुपयांची मुद्दल आणि त्यावरील व्याज मिळून सुमारे ४५ कोटी रुपयांच्या थकीत रकमेसाठी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने लिलावाची नोटीस काढलीय. ही नोटीस कारखान्याच्या नोटीस फलकावर चिकटवण्यात आलीय. ९ ऑक्टोबर रोजी ई-लिलाव पद्धतीनं विक्री करणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटलंय. यापूर्वी देखील अशीच नोटीस कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने लावली होती. तेव्हा कामगार आणि बँक प्रशासन यांच्यात तुफान झटापट झाली होती. आता या नव्या नोटीसमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संतप्त भावना उसळल्या आहेत.