म्हैस दूध वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन - चेअरमन नविद मुश्रीफ

हातकणंगले तालुका संपर्क सभा खेळीमेळीत पार पडली...

<p>म्हैस दूध वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन - चेअरमन नविद मुश्रीफ</p>

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा गुरुवारी (दि.२१) रोजी स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय, अतिग्रे येथे पार पडली. यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी म्हैस दूध उत्पादन वाढवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य येत असून, ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी उत्पादकांनी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयात गोकुळ संलग्न दूध संस्थांची संपर्क सभा पार पडली. अध्यक्षस्थानी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ होते. यावेळी त्यांनी, शहरी भागात म्हैस दूधाला मोठी मागणी आहे, आणि तेवढ्याच प्रमाणात संकलन वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. गोकुळच्या स्थापनेमागे शहरातील पैसा ग्रामीण भागात पोहोचवण्याचा हेतू होता आणि त्यात यशही मिळालंय. आज गोकुळच्या ठेवी ५१२ कोटींवर पोहोचल्या आहेत. दूध संकलनासाठी २५ लाख लिटरचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. म्हैस खरेदीसाठी ५० हजार रुपयांचं अनुदान, टीएमआरच्या माध्यमातून चारा वाटप, अशा विविध योजना सुरू आहेत असे सांगितलं. 

यावेळी विविध दूध संस्थांनी आपापले प्रश्न मांडले. त्यावर चेअरमन, संचालक व अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून समस्यांचं निरसन केलं. सभेत किसान विमा योजनेअंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना आणि जनावरांच्या मालकांना विमा धनादेशाचं वाटपही करण्यात आलं. गोकुळ संघाने घेतलेले निर्णय, नवे उपक्रम आणि उत्पादन वाढीसाठी केलेले आवाहन यामुळे हातकणंगले तालुक्यातील दूध चळवळीला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, डॉ. सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्यासह तालुक्यातील विविध दूध संस्थांचे चेअरमन, संचालक, उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.