बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

<p>बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी</p>

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम बाजारपेठ म्हणून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. मात्र सध्या ही बाजार समिती भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे हित न जपता ही समिती कार्यकर्त्यांना पोसण्याचा भ्रष्ट राजकीय अड्डाच बनल्याचा आरोप करून बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे.

सेवा ज्येष्ठता डावलून काहींना पदोन्नती देऊन पगार दिल्याच्या प्रकाराची तसेच दुकान गाळे हस्तांतरण , रिकाम्या जागेत टपऱ्या लावण्याबाबत झालेल्या व्यवहाराची, प्लॉट हस्तांतरामध्ये झालेला भ्रष्टाचार साडेतीन कोटी रूपयांच्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामाची चौकशी करावी, आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. या मागण्याचे निवेदन सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक महेश कदम यांना देण्यात आले. यावेळी विजय देवणे, स्मिता सावंत, रणजित आयरेकर, तानाजी आंग्रे, मंजित माने उपस्थित होते.