पुण्यात २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो...
कोल्हापूर - मराठा समाजातील उद्योजकांना जागतिक स्तरावरील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या मराठा आंत्रप्रेन्युअर असोसिएशन अर्थात एमईएच्यावतीने पुण्यात एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
अॅग्रीकल्चर कॉलेजच्या मैदानावर २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या बिझनेस एक्स्पोबाबत एमईएच्यावतीने रविवारी सायंकाळी हॉटेल सयाजी येथील कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील उद्योजकांची बैठक आयोजित केली होती. सुरुवातीला पुणे एमईएचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना गायकवाड यांनी, मराठा उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवसाय वृध्दी केली पाहिजे, असे सांगितले. व्यवसाय वृद्धी करताना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक मराठा उद्योजकाने काळाबरोबर बदल करून व्यवसाय वाढ आणि अधिक नफा मिळविण्यासाठी कशा पध्दतीने नियोजन केले पाहिजे याची संपूर्ण माहिती बिझनेस एक्स्पो मधून मिळणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. जास्तीत जास्त मराठा उद्योजकांनी एमईएचे सभासद व्हावे आणि पुण्यातील बिझनेस एक्स्पोमध्ये सहभागी होऊन उद्योग व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
यावेळी संदीप देशमुख, राजेश कुराडे, सुनील झालटे, सईताई पाटील यांनी कोल्हापुरातील उद्योजकांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी क्रिडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, जयेश कदम, राजीव लिंग्रस, ज्येष्ठ व्यवसायिक संग्राम पाटील, विनय नलावडे, मंगेश पाटील यांच्यासह मराठा उद्योजक उपस्थित होते.