जनतेतील असंतोषाला सत्तेला हादरे कसे द्यायचे, याची जाणीव करून द्यावी लागेल - कॉम्रेड बी. युवराज
कोल्हापूर – जनतेत असंतोष आहे. या असंतोषाला सत्तेला हादरे कसे द्यावे, हे जाणीव करून द्यावे लागेल. प्रस्थापित सत्तेला आव्हान देऊन कष्टकरी जनतेची सत्ता आणावी लागेल. यासाठी नवे संघटन उभा करावे लागेल, आंदोलने करावी लागतील, तरच परिवर्तन घडेल, असे वक्तव्य कॉम्रेड बी. युवराज यांनी केले.
श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी 'नवी पिढी, नवा राजकीय विचार' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सध्याचे सरकार हे संविधान खिळखिळी करण्याचा प्रयत्न करत आहे, हा जनतेचा पराभव आहे. सरकार हिंदुत्ववाद म्हणत असले तरी हा ब्राम्हण राष्ट्रवाद आहे. सध्या भांडवलदार आणि राजकारणी यांचे साटेलोटे आहे. आधीच्या काळात सुद्धा अशी परिस्थिती होती. मात्र आताची भांडवलदार मक्तेदारी जास्त आक्रमक आहे. त्यांना संपूर्ण देश गिळंकृत करायचा आहे. सध्या जीडीपी मध्ये रिअल इस्टेटचा आठ टक्के वाटा आहे. नवे उभे राहणारे प्रकल्प म्हणजे निव्वळ पांढरे हत्ती आहेत. ठिकठिकाणीच्या जमिनी बळकावणे, त्यांच्या किंमती वाढवणे आणि नफा मिळवणे हे या सरकारचे धोरण आहे. उद्योगपती अदानी यांचे देशातील विमानतळ टार्गेट आहे. यासाठी एक लाख करोड भांडवल गुंतवण्याचे त्यांचे नियोजन आहे. मात्र रोजगार निर्मिती, जनतेच्या क्रयशक्तीत वाढ यामध्ये हे सरकार फसले आहे. जे आकडे फेकत आहेत ते फसवे आहेत, अशी टीका कॉम्रेड बी. युवराज यांनी सरकारवर केली.
सत्तेवर येतानाचा त्यांचा सामाजिक पाया सध्या खचत चालला आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत याचे परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय समाज व्यवस्थेला नव्या पद्धतीच्या मांडणीची गरज आहे. नव्याने तिथल्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीनुसार बदलाचे कार्यक्रम आखावे लागतील. स्थानिक पातळीवर नवे संघटन उभे करावे लागेल. नव्या पद्धतीच्या ट्रेड युनियन उभाराव्या लागतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. मेघा पानसरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.