शिवाजी विद्यापीठातील राजकीय अड्डा बंद करा : अधिसभा सदस्यांची प्रवेशद्वारात निदर्शने...
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाची अधिसभा सुरू होण्याआधी काही सदस्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. नियमाप्रमाणे आठ महिन्यात अधिसभा घेणे बंधनकारक असताना साडे नऊ महिन्यांनी ही अधिसभा होत आहे, त्यामुळे ही अधिसभाच बेकायदेशीर असल्याचे आरोप सदस्यांनी केले आहे.
यावेळी पूर्णवेळ कुलगुरू द्या, अधिकार पदाचा मान ठेवा, त्याचा विनोद होऊ देऊ नका, घाशीराम कोतवाल पद्धतीचा कारभार थांबवा, शैक्षणिक गुणवत्ता वाढवा, भ्रष्टाचार बंद करा, बेकायदेशीर कारभार थांबवा, असे आशयाचे पोस्टर सदस्यांनी परिधान केले होते. याप्रसंगी विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कायमस्वरूपी कुलगुरू नसल्याने विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळत आहे. गेल्या दोन महिन्याच्या प्रभारी काळामध्ये विद्यापीठात घाशीराम कोतवाल नाट्य चालू आहे. मनमानी कारभार समन्वयाचा अभाव आणि इतर आरोप प्रशासनावर होत आहेत. प्रशासन राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे विद्यापीठातील राजकीय अड्डा बंद करा आणि पूर्णवेळ कुलगुरू द्या, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये अधिसभा सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, ॲडव्होकेट अजित पाटील ॲडव्होकेट अभिजीत कापसे, अमित जाधव, विष्णू खाडे आदींचा सहभाग होता.